ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ तेलंगणा मॉडेल संबंध देशभर नेणार -के. चंद्रशेखर राव
नांदेड– तेलंगणाचे मुख्यमंत्री बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव आज पुन्हा नांदेडमध्ये आले. गेल्या साडेतीन महिन्यांत ते तिसऱ्यांदा नांदेडला आले असून येथे त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या उपस्थितीत नांदेड येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. भारत राष्ट्र समितीच्या वतीने राज्यातील २८८ मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. यापैकी किती जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित आहेत, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
भारत राष्ट्र समातीने राज्यातील सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणुन नांदेड येथे दि. १९ व २० मे रोजी अनंता लॉन्स येथे महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही आज उपस्थिती होती.
तेलंगणा मॉडेल संबंध देशभर नेणार -मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे होऊन गेले तरीही देशातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा पुरविण्यास येथील भाजप, काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) महाराष्ट्रातून प्रवेश करत आहे, महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि येथूनच क्रांती घडणार हा माझ्या मनात दृढ विश्वास आहे. तेलंगणा मॉडेल तुमच्या ताकदीवर संपूर्ण भारतभर पोहोचू असा विश्वास तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पार्टीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री केसीआर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार बी. बी. पाटील, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, माजी खासदार हरीभाऊ राठोड, सुरेश गायकवाड, प्रा. यशपाल भिंगे, प्रवीण जेठेवाड, नागनाथ घिसेवाड यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री केसीआर बोलताना म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली परंतु या देशातील नागरिकांना आजही स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही ना वीज. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव नाही ही बाब देशासाठी अत्यंत लाजीरवाणी असल्याचे ते म्हणाले. देशातील शेतकरी जगला पाहिजे यासाठी राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्र अशा क्रांतिकारी राज्यातून बीआरएसने सुरुवात केली आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या. बीआरएस पक्ष हा निवडणुकीसाठी कधीच काम करत नाही तर शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे काम करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आज तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशभर चर्चिल्या जात आहे. देशाच्या दिल्ली, मुंबई या सर्वच मोठ्या शहरांना मुबलक पाणी मिळत नाही. देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकांना कारागृह झाला, गोळ्या घालण्यात आल्या, परंतु हा बदल येणाऱ्या काळात फक्त बीआरएस करून दाखवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाला भाव मिळावा म्हणून पदयात्रा काढावे लागते, आंदोलन करावे लागतात, मग देशात लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाला पिण्याचे पाणी देण्याची बीआरएसची तयारी असून हे काही देवी देवतांचे काम नाही यासाठी माणसालाच काम करावे लागते आणि त्यासाठी इच्छाशक्ती लागते असेही त्यांनी देशातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना टोला लागला.
ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरावर येणाऱ्या काळात समित्या नेमणार असून या समितीच्या माध्यमातून बीआरएस संबंध महाराष्ट्रभर वाडी, गाव, तांड्यावर पोहोचला पाहिजे. जिम्मेदारीने काम करा होत नसेल तर आत्ताच बीआरएस मधून बाहेर पडा असा सज्जड इशारा दिला. समितीच्या पदाधिकाऱ्यांना विशेष करून विधानसभा निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे टॅब देण्यात येणार असून त्या टॅपचा वापर करून शेतकऱ्यांच्या योजना सर्वसामान्यांच्या योजना त्यांना समजून सांगून बीआरएसमध्ये जोडण्याचे काम जोमाने करा असेही आवाहान त्यांनी केले. राज्यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी बीआरएस स्वतःचे पक्ष कार्यालय लवकरच सुरू करणार असून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची राहण्याची व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. देशामध्ये बदल घडवायचा असेल तर बीआरएस पक्ष आता ताकतीने राष्ट्रीय राजकारणात उतरला आहे. आता झालेल्या कर्नाटका निवडणुकीमध्ये भाजप हारली तर काँग्रेस जिंकली परंतु यातून तेथील जनतेला काहीही फायदा होणार नाही. कारण गेली 75 वर्ष भाजप आणि काँग्रेसच्याच हातात सत्ता असून देश रसातळाला गेला आहे. तेलंगणा मॉडेल संबंध भारतभर नक्कीच पोहोचू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व त्यानंतर पक्षाचे ध्वजारोहण करून दोन दिवसीय चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले असे त्यांनी यावेळी जाहीर केले. या शिबिराला महाराष्ट्राच्या विविध मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरात भारत राष्ट्र समितीची ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा कोअर कमिटी स्थापना अभियान (मुख्य शाखा, किसान सेल, युवक सेल, महिला सेल, एस सी सेल, एस टी सेल, अल्पसंख्याक सेल, कामगार सेल आदी), महाराष्ट्रातील समस्यांबद्दल चर्चा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाय योजना, यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, विधानसभा निवडणुका तयारी, पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान व प्रचार या संबंधाने चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻