ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ
नांदेड– धुलीवंदन निमित्त जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून ड्रायडे होता. मात्र काल या दिवशी शहर व जिल्ह्यात अवैध दारूचा जणू महापूर आल्याचे दिसून आले. नांदेड पोलिसांच्या कारवाईत जिल्हाभरातून जवळपास 25 ठिकाणी धाडी टाकून कारवाई करीत दारू विक्रेत्यांना अटक केली. शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी, विदेशी, हातभट्टी आणि शिंदी दारूची विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र अनभिज्ञ कसे होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सव्वालाख रुपयांची देशी- विदेशी दारू जप्त करण्यात आली.
जिल्ह्यात धुळवडीनिमित्त अवैध मार्गाने बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारू विकणाऱ्यांनी हात धुवून घेण्याचा प्रयत्न करीत दारूचा अवैध साठा करून ठेवला होता. परंतु पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाई करून अवैध दारु जप्त करण्यात आली. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्यासमोर मच्छी मार्केट जवळ सुरेश राम पवार याला अटक करून त्यांच्याकडून 3,690 रुपयांची दारू जप्त केली. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनीष साहेबराव जोगेवार याच्याकडून सहा हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई विमानतळ रोड सांगवी येथील जय महाराष्ट्र धाब्यावर केली. माता गुजरी चौक जवळील ढाब्यावर विमानतळ पोलिसांनी कारवाई करून राजेश शंकर धसाडे याला अटक करून त्याच्याकडून साडेसात हजाराची विदेशी दारू जप्त केली. शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतुनही दोन हजार रुपयांची दारू जप्त करून गणेशनगर वाय पॉईंटजवळ जय भीमनगर येथून कैलास मधुकर वन्ने याला पोलिसांनी अटक केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करून जवळपास दहा हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन अडीच हजार रुपयांची देशी दारू गुरुद्वारा गेट नंबर दोन जवळील बालाजी कांबळे याच्याकडून जप्त करण्यात आली.
हदगाव तालुक्यातील तळणी येथून साहेब पडघणे याला अटक करून त्याच्याकडून बारा हजार रुपयांची देशी व विदेशी दारू हदगाव पोलिसांनी जप्त केली आहे. उमरी ठाण्याच्या हद्दीतुनही तीन हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढरी गल्ली धर्माबाद येथून एकाला ताब्यात घेऊन सहा हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. उमरी येथून रापतवार नगर भागात राहणाऱ्या एका महिलेकडून तीन हजार रुपयांची विदेशी देशी दारू जप्त करण्यात आली आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृष्णूर येथील सुधाकर व्यंकटी बोईनवाड याला अटक करून त्याच्याकडून सहा हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.
सोनखेड पोलिसांनीही कपिलेश्वर कॉम्प्युटर सेंटरच्या पाठीमागे शेवडी बाजीराव येथे कारवाई करून दीड हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. व्यंकट दत्तात्रय जाधव यांच्या घरासमोर कृष्णूर येथे पोलिसांनी कारवाई करून सदाशिव व्यंकट जाधव आणि राजेश फुलाजी दोघे राहणार कृष्णूर यांना अटक करून त्यांच्याकडून 30 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या दोघांविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दोन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. देगलूर शहरातही बंडा गल्ली परिसरात नागेश शंकर जिंकलवाड याच्याकडून चार हजार रुपयाची सिंदी जप्त करण्यात आली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन सुगाव येथून एकाकडून दोन हजार रुपयांची दारू सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी जप्त केली आहे. मुदखेड येथून दुर्गा नगर भागात राहणारा राजेश बंडु जाधव यांच्याकडून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. कंधार तालुक्यातूनही शेकापुर फाटा येथील दीड हजार रुपयाची दारू पोलिसांनी जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजाराची दारू हाणेगाव येथून जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच मुदखेड येथील मारुती जीवन चव्हाण यांच्याकडून तीन हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. नांदेड पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाभरात कारवाई करून पंचवीस ठिकाणांहून सव्वालाख रुपयांची दारू जप्त केली आहे. आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर आणि जिल्ह्यात सुमारे 25 ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 27 च्या वर आरोपींना अटक करीत हजारों रुपयांची दारू जप्त केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻