ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ‘अग्निपथ’ विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
“अग्निपथ” योजनेच्या विरोधात तेलंगणा, बिहारसह विविध राज्यात पेटलेली आग आता इतर राज्यांमध्ये देखील पोहोचली आहे. या आंदोलनाला आता जीवघेणे वळण लागले आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये काल शुक्रवार दिनांक 17 जून रोजी आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ होऊन रेल्वे जाळण्यात आल्याचे प्रकार घडले. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. याचा रेल्वे दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नांदेड येथे रेल्वेस्थानकावर अनुचित प्रकार घडू नये, रेल्वेची तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग रेल्वे पोलीस यांनी रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढविली आहे.
या हिंसक आंदोलनामुळे नांदेडहुन जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द झाल्याने बरेच प्रवासी अडकून पडले आहे. तर अनेकांनी आपले तिकीटं रद्द करुन घेतली आहेत. नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, अमृतसर या भागातून शीख भाविक मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये दाखल होत असतात. येथील रेल्वे स्थानकावरून दररोज जवळपास 95 हून अधिक रेल्वे गाड्यांची ये- जा होते. हजारो प्रवासी यातून प्रवास करीत असल्याने हे रेल्वेस्थानक मराठवाड्यातील दक्षिण मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते.
त्यामुळेच “अग्निपथ” च्या विरोधात सुरू असलेले आंदोलन व त्या आंदोलनाला मिळत असलेले हिंसक वळण यामुळे नांदेडच्या रेल्वे स्थानकाला सुरक्षा वाढविण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी-कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात तळ ठोकून आहेत. येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलीस विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानक परिसरात प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. नांदेड पोलीसांनीही श्वान पथकाच्या व विशेष पथकाच्या मदतीने रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे. यासोबतच मुदखेड, परभणी, पूर्णा, हिंगोली, सेलू, मानवत या प्रमुख रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
