Friday, December 6, 2024

नांदेड-लोहा-लातूर आणि बोधन-मुखेड-लातूर रेल्वे मार्गाचे लवकरच सर्वेक्षण; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खा.चिखलीकर यांना आश्वासन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड : नांदेड – लोहा – लातूर आणि बोधन – मुखेड – लातूर या दोन नवीन रेल्वेमार्गाचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघातील रेल्वेविषयक मागण्यांसाठी खा. चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी तत्वतः मान्य केल्याचे सांगितले.

नांदेडसह मराठवाड्यातील रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी,  अधिकाधिक रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वेच्या अनुषंगाने असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नांदेड-देगलूर-बिदर रेल्वेमार्गाचा प्रश्न मागील 30 ते 35 वर्षांपासून प्रलंबित होता. आता नांदेड – लोहा – लातूर आणि बोधन- मुखेड- लातूर या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळण्यासाठीही खा.चिखलीकर आणि आग्रही भूमिका घेतली आहे. खा. चिखलीकर यांनी खासदार झाल्यानंतर नांदेड-लोहा-लातूर रेल्वेमार्गाची सर्वप्रथम मागणी करून त्या दिशेने पावले टाकली होती. या बाबतीत त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्षही  वेधले होते. त्यानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेऊन या दोन्ही रेल्वेमार्गाची उपयुक्तता विशद केली.

नांदेडचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड-देगलूर-बिदर रेल्वेमार्गाचा प्रश्न पहिल्याच टप्प्यात सोडविला. मागील वर्षी या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आणि चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात या कामासाठी 2552 कोटी रुपयांच्या प्रस्ताव मंजुरीसह टोकन ग्रँट सुरु झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी वेळेत निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खा. चिखलीकर यांनी दिली.

या दोन्ही रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येत्या काही दिवसात निर्णय घेण्याची ग्वाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खा. चिखलीकर यांना दिली. त्यामुळे रेल्वेच्या विकासापासून दूर असलेल्या देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव, लोहा, कंधार या तालुक्यातील अनेक प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या भागातील रेल्वेमार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागून  जिल्ह्यात रेल्वेचे सर्वत्र जाळे विणले जाईल, असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. बिदर चे खासदार केंद्रीय राज्यमंत्री भागव खुबा, लातूरचे खासदार सुधाकरराव  शृंगारे यांचेही या कामी सहकार्य मिळत आहे, असे सांगण्यात आले.

राज्यराणी एक्सप्रेसला लवकरच अतिरिक्त डबे

नांदेडहून मुंबईसाठी राज्यराणी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी  खा.चिखलीकर यांनी प्रयत्न केले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यराणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणण्याचा निर्णय घेत नांदेडसह मराठवाड्यातून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे एक्सप्रेसची सेवा उपलब्ध करून दिली. त्यानंतर आता राज्यराणी एक्सप्रेसला आणखी सहा अतिरिक्त डबे जोडण्यात यावे, अशी मागणी खा.चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. त्यावरदेखील लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!