Friday, December 6, 2024

सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणाधिकारी, सभापती सबकुछ महिलाच! ‘महिलाराज’ असणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिन सप्ताहाचा जल्लोष

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी या जिल्हा परिषदेतील सर्व महत्वांच्या पदावर नांदेडमध्ये महिला विराजमान आहेत. यामुळे नांदेड जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने ‘महिलराज’ असून या सर्व कर्तृत्ववान महिलांकडून जागतिक महिला दिन सप्ताहाला जल्लोषात सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात कुठेही नसेल असा खऱ्या अर्थाने महिलराज नांदेड जिल्हा परिषदेत पाहावयास मिळतो. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर सौ. वर्षा ठाकूर- घुगे, अध्यक्षपदावर सौ. मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष सौ. पद्मा रेड्डी सतपलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, शिक्षणाधिकारी(प्रा.)पदी सविता बिरकले अशा महिला विराजमान आहेत, त्याचबरोबर महिलांसाठीच्याच महिला व बालकल्याण सभापतीपदावर सौ. सुशीलाताई पाटील बेटमोगरेकर या विराजमान आहेत. अशाप्रकारे नांदेड जिल्हा परिषदेत सर्वच प्रमुख पदांवर महिला विराजमान असून त्या उत्कृष्टपणे आपले योगदान देत आहेत. याशिवायही इतरही अनेक महिला या जिल्हा परिषदेतील अनेक महत्वाचा पदावर कार्यरत आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त “उत्‍सव स्‍त्री जाणीवांचा! पाऊल पडते पुढे” हा महिला सप्‍ताहानिमित्तचा कार्यक्रम बुधवार दि. 2 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात घेण्यात आला. सर्व प्रमुख अधिकारी- पदाधिकारी महिलांनी या सप्ताहाला अत्यंत उत्साहात सुरुवात केली. कार्यक्रमास जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, डॉ. अर्चना बजाज यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी राजमाता माँ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. त्‍यानंतर उपस्थिताचा बुके देवून सत्‍कार करण्‍यात आला. महिला व बाल कल्‍याण विभागाच्‍यावतीने राबविण्‍यात येणाऱ्या मिशन नवचेतना उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्‍यात आला. याप्रसंगी दिनांक 2 ते 8 मार्च दरम्‍यान महिला सप्‍ताह निमित्त घेण्‍यात येणाऱ्या कार्यक्रम माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्यावतीने मुलीच्या सन्मानासाठी ‘मुलीचे नाव घराची शान’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे.

शिक्षण हे महत्त्वाचे असून, प्रत्येक महिलांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची दालने खुली करून दिली. आज शिक्षणाच्या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. याचा फायदा महिलांनी घ्यावा. ग्रामीण भागात वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. ग्रामीण भागातून किमान पदवीपर्यंत शिक्षण मुलींना द्यावं. मुलगा-मुलगी  असा भेद न करता पालकांनीदेखील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्‍यावा, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. जिल्हा परिषदेने मुलीच्या सन्मानासाठी ‘मुलीचे नाव घराची शान’ हा उपक्रम राबवून महिलांचा सन्‍मान केला असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.

याप्रसंगी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संतोष तुबाकेले, जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे, गट विकास अधिकारी वाय.आर, मेहत्रे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी महिला बचत गटामार्फत उत्‍पादित स्‍टॉलचे उद्घाटन कण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले. ज्‍योती गंगमवार यांनी स्‍वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन अनिता दाणे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यूट्यूब चैनल वरून लाईव्ह प्रसारित करण्यात आला.

समग्र महिला सक्षमपणे पुढे येण्यासाठी जाणीवपूर्वक कार्यक्रमाचे नियोजन -वर्षा ठाकूर
महिला दिनाच्या औचित्याने हा सप्ताह म्हणजे महिलांचं आत्मबल वाढविण्याचा आणि व्यक्तिमत्व विकासाचा कार्यक्रम आहे. सर्व क्षेत्र महिलांनी काबीज केली आहेत. तरीदेखील ठराविक महिलाच व्यक्त होताना दिसतात. म्हणून समग्र महिला सक्षमपणे पुढे येण्यासाठी या कार्यक्रमाचे जाणीवपूर्वक नियोजन केलेले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो महिलांना. नवरे घरी होते. मुले घरी होते. सर्वांच्या खाण्याच्या फर्माईशी होत्या. महिलांना मात्र सर्वांची सरबराईस करीत राहावं लागलं. लॉकडाऊन अत्यंत तणावपूर्ण झालं होतं. अशा स्थितीत श्रमिक असणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला मात्र प्रचंड काम येत गेलं. स्त्री म्हणून जगताना स्त्रियांची ही ससेहेलपट होत राहिली. असे मत मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्‍यक्‍त केले. त्‍या म्‍हणाल्‍या, महिलांमध्ये खूप मोठी क्षमता आहे. ह्या क्षमता ओळखून महिलांनी आपल्‍या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. आयुष्य जगताना कुटूंबासह महिलांनी स्‍वत:कडे व आरोग्याकडे लक्ष द्यावे असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!