ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• राजूरकर यांना 329 तर आष्टीकर यांना केवळ 84 मते
नांदेड (प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बहुचर्चित अशा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांना 339 मते मिळाली असून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना पाच मते मिळाली आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण 451 मतांपैकी 23 मते ही बाद ठरली आहेत.
नांदेड स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यात भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ३३९, महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार कृष्णा पाटील यांना ८४ तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना ५ अशी मते पडली आहेत.

भाजपला जागा
नांदेड विधान परिषदेची ही निवडणूक अगदी सुरुवातीपासून चर्चेत होती. महायुतीमध्ये ही जागा कुणाला सुटणार ? यावरून मोठी स्पर्धा होती. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे, भाजपाला ही जागा सोडवण्यासाठी आग्रही होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आणि या मतदारसंघाचे माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना अमरनाथ राजुरकर यांनी दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. आता भाजपकडून विजय मिळवत त्यांनी या मतदारसंघात हॅट्रिक साधली आहे.
खा. अशोकराव चव्हाण, आ. चिखलीकर एकत्र
त्यानंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सामंजस्याची भूमिका घेत एकत्र आले. त्यानंतर ही निवडणूक काहीशी एकतर्फी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते, निकालानंतर ते स्पष्टही झाले आहे.
खासदार नागेश पाटील आष्टीकर
त्यानंतर ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे तर ही निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली. खासदार आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. कृष्णापाटील आष्टीकर यांच्यासाठी काँग्रेसनेही ऐनवेळी माघार घेतलेली होती. पण अचानक खासदार आष्टीकर यांनी पक्ष बदलल्याने ही निवडणूक अधिकच चर्चेत आली. त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे निवडणुकीतून माघार घेणार की सत्ताधारी महायुतीचे मतदार त्यांना समर्थन देणार ? अशी काहीशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र तसे काहीही झाले नाही आणि भाजपचे अमरनाथ राजुरकर यांनी या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवीत हॅट्रिक साधली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



