ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन
नांदेड- जिल्ह्याचेपालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर रांगोळी काढण्यास जाणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन म्हणून या महिला पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी काढून निषेध करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी या महिला कार्यकर्त्यांची महिला पोलिसांशी झटापटही झाली.
भाजपा युवती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर रांगोळी काढण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर यावेळी झालेल्या झटापटीत महिलांनी रस्त्यावरच काळी रांगोळी उधळून निषेध व्यक्त केला.
भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष महादेवी मठपती, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शततारका पांढरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मी वाघमारे, सोशल मेडिया शिवरानी हंगरगे, महिला जिल्हा कोषाध्यक्ष कांचन ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या शिवाजीनगरस्थित निवासस्थानासमोर यावेळी घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर शंभर मीटर अंतरावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महिलांना पुढे जाऊ देण्यात येत नसल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, युवा मोर्चा सरचिटणीस सुनील पाटील, हुकुमसिंग ठाकूर हेही तिथे पोहोचले.
गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यासाठी आलेल्या महिलांना आपण का रोखता? असा सवाल प्रवीण साले यांनी यावेळी केला. महिला पुढे जात असताना पोलिसांनी अटकाव केल्यामुळे येथे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. काळा कायदा रद्द करा, विद्यापीठाच्या जमिनी बळकावणाऱ्या आघाडी शासनाचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.
या सर्व महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे आणले. त्या ठिकाणी जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली. भाजपच्या आंदोलनाची दखल घेऊन विद्यापीठातील काळा कायदा रद्द केला नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवीण साले यांनी याप्रसंगी दिला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻