ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ घातपातानेच मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप
धर्माबाद (जि. नांदेड)- मित्राने बोलावून नेलेल्या धर्माबाद येथील युवकाचे प्रेत गोदावरी नदीत सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भुजंग उर्फ छोटू नागोराव सूर्यवंशी पाटील बाभळीकर (वय 31 वर्ष) यांना दि. 5 मार्च 2023 रविवार.रोजी सकाळी सात वाजता रत्नाळी येथील प्रल्हाद उर्फ पप्पू शंकरराव चातरवाड नवीन ओळख झालेला मित्र यांनी झोपेतून उठवून मोटरसायकलवर सोबत घेऊन गेले. ते जाताना दहा हजार रुपये घरून घेऊन गेले. मोबाईल मात्र नको असे मित्र पप्पू याने सांगितल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पत्नीने फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, पती छोटू पाटील यांनी सकाळी 9. 38 वाजता मला मोबाईलवर सांगितले की, मला पप्पू येऊ देत नसून मासे खाऊ घालतो म्हणत दारू पाजवीत आहे. मला येऊ देत नाही याचा मला संशय येत आहे. चार वाजेपर्यंत मी जर नाही आलो तर याच फोनवर संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. हेच शेवटचे बोलणे झाले.
आरोपी मित्र पप्पू दुपारी साडेपाच वाजता छोटू पाटील यांच्या घरी चार टरबूज घेऊन आले आणि छोटू पाटील आले का म्हणून विचारणा केली. मी म्हणाले की, तुम्ही त्यांना घेऊन गेलात, त्यांना घेऊन या. तेव्हा तो, मी त्यांना रेल्वे गेटला आणून सोडले इतकेच सांगत उडवाउडवीची उत्तरं देऊन निघून गेला. मी सर्वत्र शोधाशोध केली परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी धर्माबाद येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल रेकॉर्ड प्रमाणे माहिती दिल्यावरून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी अपहरण केल्याचा गुन्हा कलम 365 प्रमाणे नोंद करून अपहरणकर्त्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
जयश्री भुजंग पाटील यांनी दिलेली तक्रार व घेतलेला संशय अखेर खरा ठरल्याचे दिसून येत असून दिनांक 8 मार्च रोजी दुपारी शिरजखोड येथे गोदावरी नदीच्या पात्रात त्यांचे पती छोटू पाटील यांचे सडलेले प्रेत तरंगताना दिसले. ही माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून, धर्माबाद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबाच्या ताब्यात दिले. बाभळी बंधारा येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत छोटू पाटील हे उत्तम वक्ता, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन लहान मुली, एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार पंतोजी पुढील तपास करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻