ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुदखेड (जि. नांदेड)- मुदखेड तालुक्यातील मुगट शिवारात असलेल्या इसार पेट्रोलपंपाजवळील वळण रस्त्यावर नांदेडहून मुदखेडकडे येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि मुदखेडहून नांदेडकडे जात असलेल्या ऑटोची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत ऑटोमधील चार जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला.
मुदखेड तालुक्यात मागील पाच महिन्याखाली असाच एक अपघात होऊन त्या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी प्रवाशांवर काळाने घाला घातला असून यात चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. सरोजा रमेश भोई (वय ४०) रा. मेहकर जिल्हा बुलढाणा, गाली कल्याण भोई (वय २४) रा. गेवराई जिल्हा बीड, जोयल कल्याण भोई, गेवराई जिल्हा बीड, पुंडलीक किशनराव पोलाटकर रा. सावरगाव माळ ता. भोकर (वय ७०) यांचा समावेश आहे.
ऐन रामनवमीच्या दिवशी झालेल्या या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघातातील मयतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्यासह मुदखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शहरातील नागरिकांनीही अपघातस्थळी मृत्यू पावलेल्या लोकांना अंबुलन्समध्ये टाकण्यासाठी शेख रिजवान, शेख इमरान भंगारवाले, शेख मोहसीन बागवान, खाजाभाई कुरेशी, ऋषिकेश पाटील पारवेकर, भीमराव पाटील कल्याणे आदींनी अपघातस्थळी मदत केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻