ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक
•आज पत्रकार परिषदेत करणार जाहीर

नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत नांदेडमध्ये मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून चर्चा सुरू असलेले खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज गुरुवारी या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होणार आहे.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत चांगलाच रंग भरलेला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंग भरल्याचे दिसून येत होते; मात्र आता यात ट्विस्ट आला आहे.
या निवडणुकीतील कट्टर विरोधक किंवा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात असलेले भाजप नेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेच एकत्र येणार आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नगरसेवकांची अर्थात मतदारांची संख्या पाहता ही निवडणूक काहीशी एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आज गुरुवारी आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार अशोकराव चव्हाण हे आमदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाणार असून आमदार चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे. ही माहिती आमदार चिखलीकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने नांदेड विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार हे स्पष्ट होत आहे त्यामुळे महायुतीचे भाजप उमेदवार अमर राजूरकर यांचे पारडे जड झाल्याचे या एकंदर बदलत्या राजकीय स्थितीवरून दिसून येत आहे.
संघर्षानंतर आता पुन्हा एकत्र
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तत्कालीन भाजप खासदार चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यात काही दिवस काही दिवस गुण्यागोविंदाने गेले, मात्र लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला . आता पुन्हा हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे दिसून येत असून यामुळे नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे. या दोन नेत्यांमधील हा एकोपा कायम राहिल्यास येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीतही नांदेड जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलल्याचे दिसून येणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



