ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•काल सायंकाळी आलेले स्पेशल फ्लाईट
नांदेड (प्रतिनिधी)- सध्या राज्यभरासह देशभरातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ने खळबळ उडालेली आहे. यातच काल नांदेड येथून खासदारांना घेऊन गेलेले स्पेशल चार्टर्ड फ्लाईट या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नांदेडला आलेल्या या खास विमानाचा फोटो ट्विट करीत “अपना सपना मनी मनी” अशी टीका केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची नांदेडमध्ये लगबग सुरू असल्याचे काल मंगळवारी दिसून आले. नांदेड विमानतळावर मंगळवारी सायंकाळी आलेल्या ‘स्पेशल चार्टर्ड फ्लाईट’ने या चर्चांना तेजी आली.
Godateer Samachar Marathi Daily https://epaper.godateer.com/

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या मोहिमेवर हे ‘स्पेशल चार्टर्ड फ्लाईट’ नांदेडमध्ये आल्याचे बोलले गेले. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, याच मोहिमेवर हे स्पेशल चार्टर्ड फ्लाईट नांदेडला आल्याचे आज बुधवारच्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
शिवसेना ठाकरे गटातून फुटून सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आज बुधवारी या सहा खासदारांनी दिल्लीत लोकसभा सभापतींची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.
नांदेड मार्गे दिल्ली
ठाकरे गटातून फुटणाऱ्या खासदारांमध्ये नांदेडच्या आसपासचे खासदार असल्याचे सांगितले गेले. यातील तीन खासदार हे नांदेडच्या आसपासच्या जिल्ह्यातील खासदार आहेत. नांदेड विमानतळावरून उड्डाण घेणे त्यांना सोयीचे असल्याने, नांदेड विमानतळावरून त्यांना घेऊन जाण्यासाठी या स्पेशल चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करण्यात आली होती; हे आजच्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. नांदेडच्या आसपास हिंगोली, परभणी त्याचबरोबर यवतमाळ हे लोकसभा मतदारसंघ आहेत.
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ) हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे आजच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. दरम्यान नांदेड आणि नांदेडला आलेले ते स्पेशल चार्टर्ड फ्लाईट हे यानिमित्ताने चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



