ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•१५ ऑगस्ट ला घोषणेची शक्यता
•भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा दावा
नांदेड/ लातूर (प्रतिनिधी)- महसूल आयुक्तालयावरून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नांदेड विरुद्ध लातूर या राजकीय आणि प्रशासकीय संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी अप्पर आयुक्तालय स्थापन करण्यात येणार असल्याचा दावा लातूर जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे. या संदर्भात पुढील एक ते दोन महिन्यांत बहुधा १५ ऑगस्ट रोजी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार पवार यांनी सांगितले की, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी स्वतः मला तसेच भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनाही या निर्णय प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महसूल आयुक्तालयाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंना समन्वयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.
नवीन जिल्हा निर्मितीनंतर…
आ. पवार यांनी पुढे सांगितले की, भविष्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात आल्यानंतर लातूर आणि नांदेड येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय सुरू करण्याचा मार्ग अधिक सुलभ होऊ शकतो. त्यामुळे सध्या अप्पर आयुक्तालयाचा पर्याय हा पुढील प्रशासकीय पुनर्रचनेचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
महसूल आयुक्तालयाच्या मागणीवरून अनेक वर्षांपासून दोन्ही जिल्ह्यामध्ये राजकीय संघर्ष, जनआंदोलने आणि प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा सुरू होता. आता दोन्ही शहरांना अप्पर आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रशासकीय बळ देण्याचा पर्याय पुढे आला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण घडामोडींची माहिती भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनाही असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा निर्णय
खासदार अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्यानंतर त्यावर नांदेड विरुद्ध लातूर असा मोठा वाद निर्माण झाला; हे प्रकरण न्यायालयातही गेले आणि नवीन महसूल आयुक्तालयाचा प्रश्न काहीसा रेंगाळत पडला. तेव्हापासून सुरू असलेल्या या राजकीय आणि प्रशासकीय संघर्षावर आता तोडगा काढण्यात येत असल्याचे एकंदर स्थितीवरून दिसून येत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महसूल आयुक्तालयाच्या मुद्द्यावर भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी “भाजपमध्ये माझी सीनियरिटी आहे, त्यामुळे माझ्या शब्दालाच पक्षात वजन आहे,” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उद्देशून प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.
आता अभिमन्यू पवार यांनी मांडलेला अप्पर आयुक्तालयाचा पर्याय आणि पुढील एक-दोन महिन्यांत निर्णय होण्याचा दावा, यामुळे महसूल आयुक्तालयाचा दीर्घकाळ सुरू असलेला वाद खरोखरच मिटणार का ? याकडे नांदेड आणि लातूरसह मराठवाड्याचे आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



