ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- शहराच्या सांगवी परिसरात गोपाळनगर भागात राहणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या दोन चिमुकल्या मुलांना चार चाकी वाहनात घेऊन शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी पहाटे साडे सातच्या सुमारास आमदुरा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळून आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुदखेड आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसडीआरएफ पथकाच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.
मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर येथील राहणारे सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळा पोटा बु. तालुका हिमायतनगर येथे कार्यरत होते. त्यांची पत्नीही जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. ते मागील काही वर्षापासून सांगवी विमानतळ परिसरातील गोपाळनगर भागात वास्तव्यास होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचे लिहून दोन्ही मुलांना आपल्याच चार चाकी वाहनात घेऊन आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पसरताच शहरात सर्वत्र खळबळ उडाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी, पत्नीने, महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच जीव रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची प्रचंड गर्दी जमल्याने पोलिसांनी त्यांना इतरत्र हटविले. या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. शिक्षकासह मुलगा सुमित आणि मुलगी सारा या दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यास एसडीआरएफ पथकाला यश आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली असून शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



