ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या देगलूर नाका परिसरातील हिलालनगर भागात दारू पिण्यास मनाई करणाऱ्या युवकावर तिघांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा निर्घृन खून केल्याची घटना 14 जुलै रोजी पहाटे एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
देगलूरनाका भागातील हिलालनगरमध्ये राहणारा सलमान सय्यद युनूस हा आपल्या घरी सायंकाळी सहाच्या सुमारास बसला होता. यावेळी त्याच्या घराच्या पाठीमागे याच गल्लीत राहणारे असलम उर्फ जडो सय्यद आलम राहणार हिलालनगर, शेख अक्रम शेख मेहबूब राहणार उमर कॉलनी दबकपूल आणि शेख अमीर शेख महंमद हे तिघेजण दारू पीत बसले होते. यावेळी सलमान सय्यद याने त्यांना येथे बसून दारू पिऊ नका म्हणून मनाई केली. यावेळी यांच्यामध्ये वाद झाला. गल्लीतील काही नागरिकांनी हा वाद त्यावेळी मिटवला.
त्यानंतर 14 जुलै रोजी पहाटे एकच्या सुमारास हे तिघेही सलमानखान यांच्या घरी आले आणि त्याला आवाज देऊन घरापासून काही अंतरावर नेऊन खंजरने वार करून त्याचा निर्घृन खून केला. ही बाब मयताचा भाऊ सय्यद अरबाज सय्यद युनूस याने प्रत्यक्ष पाहिल्याने तातडीने त्याने लगेच आपल्या अन्य नातेवाईकांना बोलावून जखमी सय्यद याला नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सय्यद सलमान याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्राने सांगितले.
सय्यद अरबाज सय्यद युनूस याच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 103 (एक), 115 (2), 3 (5), 4 /25, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) सुशीलकुमार नायक यांना समजताच त्यांनी तातडीने नांदेड ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
