Sunday, October 6, 2024

जेसीबी चालकाने केला इंजिनियरचा खून; क्षुल्लक वादानंतर डोक्यात जेसीबीची बुमबकेट घातली, बारड शिवारातील धक्कादायक घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- छोट्या (मायनर) कॅनॉल दुरुस्तीच्या कामावर जेसीबी चालकाने चक्क आपल्या सोबतच कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनियरच्या डोक्यात जेसीबीचे बुमबकेट घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 27 एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील बारड जवळ देगाव शिवारात घडली होती. उपचारादरम्यान गंभीर जखमी इंजिनीयरचा छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात जेसीबी चालक व कंत्राटदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर मूळचा बिहारचा असणारा चालक फरार झाला असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ईसापुर धरणाकडून येणाऱ्या पाण्यासाठी कॅनॉलमध्ये- 20 च्या दुरुस्तीचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. हे काम छत्रपती संभाजीनगर येथील डाकिन कंपनी (एजी कन्स्ट्रक्शन) द्वारे सुरू आहे. या कंपनीत इंजिनियर म्हणून गीताराम उर्फ श्याम ज्ञानोबा चाटे (वय 32 वर्षे,.राहणार मालीपारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड) हे कार्यरत होते. कंपनीचे मालक दानिश खान हे असून बिहार येथील जलालुद्दीन मोहम्मद सलाउद्दीन (राहणार सुलतानपूर तालुका भगवानपूर जिल्हा सिवान, बिहार) हा जेसीबी चालक म्हणून काम करीत होता.

अर्धापूर तालुक्यात असलेल्या देगाव शिवारात छोट्या मायनरचे काम सुरू असताना इंजिनियर गीताराम चाटे जेसीबी चालकाजवळ काम सांगण्यासाठी पोहोचला. यात दोघांत सुरुवातीला काम सांगण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. याच वादातून जेसीबी चालक जलाउद्दीन मोहम्मद सलाउद्दीन याने जेसीबीची बुमबकेट इंजिनियर चाटे यांच्या डोक्यात घातली. त्यानंतर खाली पडल्यानंतर चाटे यांच्या कमरेवर, गुप्तांगावर जेसीबीची बकेट मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर चालक जलाउद्दिन घटनास्थळावरून पसार झाला. तिथे उपस्थित कामगारांनी तातडीने ही माहिती कंपनी कंत्राटदारास सांगून जवळच असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या एका वाहनांमधून त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने येथून त्याच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले.

परंतु छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना इंजिनियरचा मृत्यू झाला. सर्व धार्मिक विधी पार पाडून मयताचा भाऊ सिद्धेश्वर ज्ञानोबा चाटे यांनी बारड पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालक जलालुद्दीन मोहम्मद सलाहुद्दीन आणि कंत्राटदार दानिश खान या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केदासे करत आहेत. घटनास्थळाला प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!