ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– उमरखेड येथे तब्बल चार गोळ्या घालून डॉक्टर भावाचा खून झाल्याचे समजल्यानंतर त्या डॉक्टरच्या दुसऱ्या डॉक्टर भावाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या दुसऱ्या डॉक्टर भावावर नांदेड येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
संबंधित बातमी – https://godateer.com/नांदेडच्या-डॉक्टरांचा-उम/
सध्या विदर्भातील उमरखेड येथे वैद्यकीय सेवा बजावणारे, नांदेडचे भूमिपुत्र डॉ. हनुमंत धर्मकरे यांचा 11 जानेवारी रोजी अज्ञात माथेफिरुने भररस्त्यात चार गोळ्या झाडून निर्घृण खून केला. आपल्या भावाचा अशाप्रकारे गोळ्या घालून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची माहिती कळताच मयत डॉ. हनुमंत यांचे भाऊ डॉ. बालाजी धर्मकरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर तात्काळ योग्य उपचार मिळाल्याने अनर्थ टळला. डॉ. बालाजी धर्मकरे यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. डॉ. बालाजी धर्मकरे हे किनवट येथे दंतरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत असतात.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी उमरखेड येथील डॉक्टरांनी रुग्णालय बंद करून निषेध केला. या घटनेनंतर उमरखेडसह नांदेडमध्येही खळबळ उडाली. पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र आरोपी अद्याप सापडलेला नाही. मयत डॉ. हनुमंत धर्मकरे हे मूळचे नांदेडचे असल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेऊन रास्ता रोकोही केला होता. डॉ. हनुमंत धर्मकरे यांच्या मारेकऱ्याचा तात्काळ अटक करण्यात यावी आणि खुनाच्या कारणांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मयत डॉ. हनुमंत धर्मकरे यांचे नातेवाईक प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻