ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• आज मुंबईत करणार राष्ट्रवादीत प्रवेश
•वरिष्ठ पातळीवरून हलली सुत्रं
lनांदेड – नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीमध्ये लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजप नेते, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारीबाबत कोंडी झाल्याने प्रतापराव चिखलीकर यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात हा एक प्रकारे राजकीय भूकंपच मानला जात आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भाजपमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र आता नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता चिखलीकर यांनी त्यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे. चिखलीकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडेच घेतला जाऊन चिखलीकर यांना सहजपणे उमेदवारी मिळेल असा सर्वांचाच कयास होता.
मात्र महायुतीच्या जागा वाटपात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रतापराव चिखलीकर यांच्या उमेदवारीबाबत एक प्रकारची कोंडी निर्माण झाली. आता हीच कोंडी सोडविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील सर्व नेत्यांनी चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीत उतरविण्याचे निश्चित केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. प्रतापराव चिखलीकर हे भाजपचा नांदेड जिल्ह्यातील प्रमुख चेहरा असल्याने ही बाब नांदेड जिल्ह्यातील राजकारणात एक प्रकारे राजकीय भूकंप ठरणार आहे.
मुंबईत शुक्रवारी सकाळी प्रतापराव पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. चिखलीकर यांचा दावा असलेला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्याने चिखलीकर यांच्या सोयीसाठी भाजपसह महायुतीच्या सर्व नेत्यांनी संयुक्तरीत्या हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात विशेष मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येते.
देगलूरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ?
देगलूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु, आता त्यांनाही तेथून उमेदवारीसाठी अजित पवार गटात जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻