Thursday, September 19, 2024

नांदेड महापालिकेत उद्यापासून प्रशासकराज; आज गोंधळातच पार पडली शेवटची सभा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातील विकास कामे यासह विविध विषयाला हाताळत सत्ताधारी नगरसेवकांनी पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढा वाचला, परंतु विषयपत्रिका मंजूर करण्याच्या वेळी मात्र त्यांच्यातील एकवाक्यता दुभंगली. अनेक विषयावर नगरसेवकांमध्ये वाद झाला, परंतु हा वाद इथेच सोडून उद्यापासून सर्वजण एकमेकांचे सहकारी म्हणून राहू अशी ग्वाही सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांना दिली. दरम्यान, महानगरपालिकेच्या महापौर, नगरसेवक यांचा कार्यकाळ आज सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी संपल्याने उद्या मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर पासून महापालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे असणार आहे.

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये महापालिकेची सोमवार दि. ३१ आक्टोबर रोजी दुपारी चार वाजता शेवटची सर्वसाधारण सभा महापौर जयश्री पावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर अब्दुल गफार, आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंग संधू यांची उपस्थिती होती. सुरुवातीला सभागृह नेते ऍड. महेश कनकदंडे यांनी मागील पाच वर्षात महानगरपालिकेत प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. नांदेड शहरात चांगली कामे करता आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जी सत्ताधारी नगरसेवकांच्या हातात सत्ता दिली त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत या मंडळींनी चांगली कामे केली आहेत. शहरातील उर्वरित विकास कामे आता प्रशासक म्हणून आयुक्त सुनील लहाने मार्गी लावतील. नांदेडकरांच्या प्रत्येक समस्यांकडे ते बारकाईने लक्ष देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बापूराव गजभारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सचखंड गुरुद्वारा, माहूर या देवस्थानासारखेच एक पर्यटनस्थळ नांदेड येथील बुद्धमूर्ती म्हणून व्हावे. जी जागा दिली ती कुठे आहे हेच महापालिका प्रशासनाने दाखविले नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीकडून दुजाभाव केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि सभागृहातून काढता पाय घेतला. विषय पत्रिका सुरू होण्यापूर्वी काही ज्येष्ठ नगरसेवक- नगरसेविकांनी आपला पाच वर्षाचा अनुभव सभागृहासमोर मांडला. सभापती किशोर स्वामी यांनी, विकास कामांना आडवे येणाऱ्यांना जनता आडवे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विरोधी पक्षाला दिला. विशेष म्हणजे फारुख अहमद यांनी शेवटच्या बैठकीत शारदा कन्स्ट्रक्शनला अभय का देण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांचे काम चांगले ते निवडून येतील आणि ज्यांनी कामच केले नाही ते नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत पडतील असे नगरसेवक फईम यांनी सुनावले. आयेशा बेगम, मोहिनी येवनकर, अपर्णा नेरलकर, यांनीही आपल्या पाच वर्षाच्या नगरसेवकपदाच्या काळात केलेल्या कामाची माहिती दिली. जनतेचे प्रश्न मांडले प्रशासनाकडून काही सुटलेत किंवा काही सुटले नाही असे विनय गिरडे पाटील यांनी सांगितले.

विषय पत्रिका मंजूर करण्यावरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. तसेच गेल्या सभेत झालेल्या वादावर बदवेल आणि शेरअली यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नगरसेवकांनीही येणाऱ्या काळात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या व शहरातील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्यावे. नांदेडकरांना वाऱ्यावर सोडू नये असे ज्येष्ठ नगरसेवकांनी सभागृहाला आवाहन केले. महापौर आणि आयुक्त यांनी सभा संपल्यानंतर सर्वांचे आभार मानले. आजच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेचा इतिवृत्त आणि आजच्या सभेत ठेवलेले विषय मंजूर करण्यात आले.

उद्यापासून महानगरपालिकेवर प्रशासकराज

सध्या कार्यरत असलेल्या महानगरपालिकेच्या महापौर, नगरसेवक यांचा कार्यकाळ सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी संपल्याने उद्या मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर पासून महापालिकेची चावी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे जाणार आहे.

जिल्हा परिषद पाठोपाठ आता महानगरपालिकेतही प्रशासकराज आल्याने सर्वसामान्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? अशी धाकधूक नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील अर्धवट राहिलेली कामे तातडीने मार्गी लावावेत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!