Saturday, July 27, 2024

भरधाव वेगात टायर फुटून क्रुझर खड्डयात जाऊन उलटली: दोन जण जागीच ठार, पाच गंभीर; कृष्णूरजवळील अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नायगाव– देगलूर तालुक्यातील देगाव येथून प्रवासी घेऊन नांदेडकडे येणाऱ्या क्रुजर जीपचा टायर फुटून कृष्णूरजवळ आज गुरुवार दि. १८ आगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागेवरच ठार झाले असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी तात्काळ जखमींना मदत केली. जखमींवर नायगाव व नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

देगलूर तालुक्यातील देगाव येथून आणि इतर ठिकाणाहून प्रवासी घेऊन (के. एच. ३२ – एम. ६४२३) ही क्रुजर जीप गुरुवारी नांदेडकडे निघाली. भरधाव वेगात निघालेली ही क्रुजर सायंकाळी पाचच्या सुमारास कृष्णूरजवळ अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील या क्रुजरचा टायर फुटून क्रुजर रस्त्यालगतच्या खड्डयांमध्ये जाऊन उलटली. या अपघातात एकूण प्रवाशांपैकी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुत्यूमुखी पडलेल्यांमध्ये आमदबी शे. खुलताबी (वय ५०, रा. देगाव) महेबुब बाबूशेख ( वय ४५, रा.गोजेगाव मुक्रमाबाद) यांचा समावेश आहे.

अपघात होताच जखमी प्रवाशांनी सुरू झालेला आक्रोश ऐकून आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त क्रुजर जीपकडे धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर मयत हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.

मागील काही महिन्यांपासून नायगाव, कुंटूर, रामतीर्थ, कृष्णूर, नरसी आदी भागातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशांना घेण्याच्या चढाओढीत वेगमर्यादा ओलांडून ही वाहने चालविल्या जात आहेत. यातूनच अनेक गंभीर अपघात होत आहेत. देगाव येथून निघालेली क्रुजरही भरधाव वेगात होती. टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. यातून हा गंभीर अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!