Tuesday, October 15, 2024

हृदयद्रावक: उत्खननात सापडलेल्या महिलेच्या प्रेताचे गूढ उकलले; पुढे आली हृदय हेलावणारी कहाणी !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ दुर्धर आजाराने मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह एकट्या पतीनेच केला होता दफन

हदगाव (जि. नांदेड)- जिल्ह्याच्या हदगाव येथे काल सोमवारी उत्खनन सुरू असताना सापडलेल्या महिलेच्या प्रेताचे गूढ उकलले असून हृदय हेलावणारी कहाणी पुढे आली आहे.

अत्यंत टोकाची गरिबी, दुर्धर आजार आणि यातच जवळपास कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह एकट्या पतीनेच कडाक्याच्या थंडीमध्ये खदानीमध्ये दफन केल्याची बाब उघडकीस आली आहे. परंतु इथेही तिचे दुर्दैव आडवे आले आणि काल सोमवारी अवैध उत्खनन करणाऱ्याच्या जेसीबीने तो मृतदेह उघडा पडला.

मूळचे वारंगा येथील रहिवासी असलेले विठ्ठल पतंगे सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी हदगावांत येऊन राहिला. सोबत पत्नी व मुले होतीच. दरम्यान व्यसनामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यात उद्ध्वस्त झाले. मुलगा सध्या पुणे येथे कंपनीत रोजमजुरी करतो. तर दोन मुली विवाहित आपापल्या घरी आहेत. दरम्यान विठ्ठल पतंगे यांची पत्नी पार्वतीला कॅन्सरचा आजार झाला. या आजाराचे अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु मागील काही दिवसात आजार खूपच बळावला. मागील काही दिवसापासून ते एका छोट्याशा खोलीत किरायाने राहत होते. परंतु उपचाराचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च आणि त्यातच काम धंदा नसल्यामुळे आणि वृद्धापकाळामुळे दोघांचीही उपासमार होत होती. विठ्ठल पतंगे हे मागील काही दिवसापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या मटन हॉटेलमध्ये काम करत होते व आपली पोटाची खळगी भरत होते. परंतु पत्नीच्या बिमारीमुळे तिथेही काम करता आले नाही. कँसर वाढतच गेल्यावर नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे कॅन्सरवर उपचार सुरू होता. त्यामुळे काही दिवस तेथे दोघांनाही खाण्यापिण्याची व्यवस्था झाली. परंतु आजार आटोक्यात येण्यासारखा नसल्यामुळे तेथूनही त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला व डिस्चार्ज देण्यात आला. नाईलाजाने हे जोडपे हदगावात आले. अगोदरच घर नव्हते. शेवटी नांदेडच्या रुग्णालयातून घरी पाठवल्यावर हदगावच्या बसस्थानकामध्ये दहा ते बारा दिवस काढले. परंतु सध्या एक दोन बसेस सुरू झाल्यामुळे व त्या कँसर ग्रस्त महिलेच्या अंगातून पू निघत असल्याने दुर्गंधी सुटल्यामुळे आगार व्यवस्थापनाने त्यांना येथून जाण्याचा भाग पडले.

दरम्यान त्यांनी अनेक वर्षांपूर्वी हदगावच्या दत्तबर्डी संस्थांनच्या टेकडी लगत असलेल्या सरकारी गायरान जमिनीवर ताबा केलेला होता. आणि आजही ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे. कुठेही सहारा नसल्यामुळे त्यांनी त्या टेकडीच्या बाजूला असलेल्या शेतीत मुक्काम ठोकला. अशा कठीण वातावरणात चांगल्या घरात गादी रजई मध्ये सुद्धा थंडी वाजत होती आणि हे जोडपे मोकळ्या आकाशाखाली घर नसताना कसे जिवंत राहिले असतील हा एक गंभीर आणि अंगावर शहारे आणणारा विषय आहे. त्यांच्या गरिबी व उपासमारी विषयी कुठेही माहिती नसल्यामुळे कोणीही या लोकांना मदत केली नाही. या त्यांच्या शेताच्या बाजूला दुसऱ्या एका गायरान जमिनीतून नेहमीच मुरमाचे अवैध उत्खनन होते. तिथे सुमारे पंचवीस ते तीस फूट खोलीची खदान तयार झालेली आहे. मुरुमाची गरज पडली तेव्हा या खदानीत उत्खनन करून नेले जातो.  त्यामुळे नेहमीप्रमाणेच अवैध उत्खनन करण्यासाठी काल सायंकाळी एक जेसीबी चालक काही टिप्पर घेऊन मुरुमाचे ऊत्खनन करण्यासाठी तिथे गेले. उत्खनन करण्यास सुरुवात करतात एका महिलेची साडी आणि पाय उघडे पडले. त्यामुळे घाबरून जाऊन हा काही खुनाचा वगैरे प्रकार असावा, म्हणून जेसीबी चालक जेसीबी जागेवर सोडून पळून गेला. मुरुम नेण्यासाठी आलेले टिप्पर चालक सुद्धा निघून गेले.

हा प्रकार पोलीस स्टेशनला समजल्यानंतर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पोलिस जमादार विश्वनाथ हंबर्डे व पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने यांना पाठवून घटनास्थळाची पाहणी केली. संपूर्ण प्रेत उघडे केल्यानंतर ओळख पटवण्यासाठी माहिती घेतली असता, बाजूच्या शेतात हे जोडपे राहत असल्याचे समजले. त्यांच्याकडे चौकशी केली असता विठ्ठल पतंगे यांनी सांगितले की हा मृतदेह माझ्या पत्नीचा असून कॅन्सर मुळे मृत्यू पावली. परंतु आपल्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नाहीत आणि कोणीही नातेवाईक जवळ नसल्यामुळे स्वतः एकट्यानेच दफन केल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही बाब सत्य असल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर मयत महिलेस दोन मुली असून एक अहमदनगर आणि एक यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे असल्याचे समजले.

हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड बीट जमादार विश्वनाथ हंबर्डे व त्यांच्या सहकार्याने तात्काळ याबाबतचा तपास करत अखेर त्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध लावला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!