ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– जिल्ह्यातील नऊ विधानसभा आणि एक लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव करीत मोठे यश मिळविले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत खासदार अशोकराव चव्हाण, आमदार हेमंत पाटील, माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर या नेत्यांचे एकप्रकारे राजकीय अस्तित्वच पणाला लागले होते.
जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण अवघ्या १४५७ मतांनी विजयी झाले आहेत. याआधी रविंद्र चव्हाण यांचे वडील वसंतराव चव्हाण हे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील ९ विधानसभांसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यातील या नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरा आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके बोंढारकर, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 अशा एकुण 9 जागा निवडून आल्या आहेत. तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत.
नेत्यांचे राजकीय अस्तित्व लागले होते पणाला !
माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण माजी खासदार तथा नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे एक प्रकारे जणू राजकीय अस्तित्व या विधानसभा निवडणुकीत पणाला लागले होते मात्र या सर्वच नेत्यांनी आपापले राजकीय अस्तित्व भक्कम केले आहे.
खासदार अशोकराव चव्हाण
खासदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाला पराभव पत्करावा लागल्याने अशोकराव चव्हाण यांच्या दृष्टीने हा मोठा धक्का होता. त्यांच्या भाजपामधील प्रवेशाचे या पराभवामुळे एक प्रकारे मूल्यमापन सुरू झाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक आहे त्यांच्या दृष्टीने राजकीय अस्तित्वाच्या बनल्या होत्या त्यातच भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कन्या श्रीजया यांचा विजय त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह सर्वच काँग्रेस नेत्यांनी भोकर मतदार संघात अशोक चव्हाण यांच्या कन्येचा पराभव करण्याचा जणू चंगच बांधला होता, त्यामुळेही अशोकराव चव्हाण यांच्या दृष्टीने भोकरची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. ही निवडणूक त्यांना जड जात असल्याचे चित्र निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झाले होते. मात्र अशोक चव्हाण यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करीत या मतदारसंघातून त्यांच्या कन्या श्रीजया यांच्यासाठी 50000 हून अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे निश्चितच भाजपामधील त्यांचे स्थान मजबूत होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
प्रतापराव पाटील चिखलीकर
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याप्रमाणेच प्रतापराव चिखलीकर हेही नांदेड जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील मोठे नाव! जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या गटातून निवडणूक लढवून विजय मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत स्थान निर्माण केलेले, त्यानंतर दोन वेळा आमदारकी भूषवलेले; त्यातही एक वेळा अपक्ष आमदारकी! त्यानंतर भाजपचा प्रमुख चेहरा बनत लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून मिळवलेली खासदारकी यामुळे, प्रतापराव चिखलीकर हे नांदेडच्या राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज नाव! मात्र, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच त्यांचा लोहा कंधार विधानसभा हा पारंपारिक मतदारसंघ भाजपला न सुटल्याने त्यांच्यापुढे एक प्रकारची राजकीय कोंडी निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी बहाल करण्यात आली. ही उमेदवारी सार्थ ठरवीत त्यांनी या मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत अवघड असल्याचे बोलले जात होते. या निवडणुकीतील यश -अपयशावर त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. मात्र ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकत आपले राजकीय स्थान मजबूत केले आहे.
हेमंत पाटील
हेमंत पाटील हेही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक प्रमुख नाव! महापालिकेत नगरसेवक त्यानंतर स्थायी समितीचे सभापतीपद, नांदेड दक्षिणची आमदारकी, शेजारच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने मिळविलेली खासदारकी! त्यानंतर चक्क विदर्भातील यवतमाळ मधून पत्नी राजश्री पाटील यांच्यासाठी शिवसेनेची उमेदवारी! आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळविलेली विधान परिषदेचे आमदारकी! यातून हेमंत पाटील यांचे राजकीय स्थान अधोरेखित होते. विधान परिषदेची आमदारकी मिळालेली असल्याने त्यांचे राजकीय स्थान तसेच स्थिर झालेले होते; मात्र तरीही विधानसभेची ही निवडणूक त्यांच्या दृष्टीनेही एक प्रकारे राजकीय कसोटीची होती आणि या कसोटीत ते पूर्ण उतरले आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे नांदेड दक्षिणची ही जागा त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. नांदेड उत्तरची जागा शिवसेनेला सोडून घेण्याबरोबरच नांदेड दक्षिणची ही जागाही महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे सोडून घेण्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली. आणि अखेर ही जागा शिवसेनेला सोडून घेत नंतर अत्यंत अटीतटीच्या या जागेवर त्यांनी अत्यंत नवखे असणारे आनंद तिडके बोंढारकर यांना अत्यंत आश्चर्यकारकपणे विजय मिळवून देत एक प्रकारे किंगमेकरची भूमिका निभावली आहे. त्यांनी एकप्रकारे ही निवडणूक शिवसेनेच्या राजकीय उत्कर्षाची लढाई बनविली आणि त्यात घवघवीत असे यश मिळविले.
नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेकडे मिळविण्याबरोबरच हे आमदार हेमंत पाटील यांनी नांदेड उत्तरच्या विजयातही सिंहाचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी विधानसभेच्या जागेवर संतोष बांगर यांच्या विजयातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये याची दक्षता घेत आ. हेमंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्याचप्रमाणे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विजयात आ. हेमंत पाटील यांच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटात आणण्यासारख्या राजकीय डावपेचांमुळे काँग्रेसचे दोन वेळचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना पराभव पत्करावा लागला.
एकूणच या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा आणि एकप्रकारे राजकीय अस्तित्वच या विधानसभा निवडणुकीत पणाला लागलेले होते. मात्र या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत स्वतःसाठी आणि आपल्या पक्षासाठी घवघवीत यश मिळत आपले राजकीय स्थान मजबूत केल्याचेच निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मतं :
83-किनवट: विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भिमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जाधव प्रदीप नाईक यांचा 5636 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भिमराव रामजी केराम यांना 92856 मते मिळाली तर जाधव प्रदीप नाईक यांना 87220 मते मिळाली आहेत. यामध्ये उमेदवार जाधव सचिन माधवराव (नाईक) यांना 5511 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अशोक संभाजीराव ढोले यांना 5311 मते मिळाली आहे.
84- हदगाव : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा 30067 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.
या निवडणुकीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना 113245 मते मिळाली तर माधवराव पाटील जवळगावकर यांना 83178 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना 11409 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार देवसरकर माधव दादाराव यांना 1276 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
85-भोकर : विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांचा 50551 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये श्रीजया अशोकराव चव्हाण यांना 133187 मते मिळाली तर तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांना 82636 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना 8872 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर बहुजन समाज पार्टीचे कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते यांना 1664 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
86-नांदेड उत्तर : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार अ गफुर यांचा 3502 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना 83184 मते मिळाली तर अब्दुल सत्तार अ गफुर यांना 79682 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत विराज इंगोले यांना 24266 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील यांना 22706 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
87-नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा 2132 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना 60445 मते मिळाली तर मोहनराव हंबर्डे यांना 58313 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांना 33841 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर दिलीप कंदकुर्ते यांना 17170 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
88-लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे एकनाथ रावसाहेब पवार यांचा 10973 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 72750 मते मिळाली तर एकनाथ रावसाहेब पवार यांना 61777 मते मिळाली आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर) यांना 29194 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रा. मनोहर बाबाराव धोंडे यांना 20302 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
89-नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा 47629 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये राजेश संभाजीराव पवार यांना 129192 मते मिळाली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना 81563 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. माधव संभाजीराव विभुते यांना 16043 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रहर जनशक्ती पार्टी गजानन शंकरराव चव्हाण यांना 2144 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
90-देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांचा 42999 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.
या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना 107841 मते मिळाली तर निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांना 64842 मते मिळाली आहेत. प्रहर जनशक्ती पक्षाचे उमेदवार साबणे सुभाष पिराजीराव यांना 15919 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव यांना 5403 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
91-मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा 37784 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये तुषार राठोड यांना 98213 मते मिळाली तर हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना 60429 मते मिळाली आहेत. बालाजी नामदेव खतगावकर यांना 48235 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगांबरराव पाटिल यांना 4700 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻